भाजपाने माढ्यातून निवडणूक लढण्याची मला दिली होती ऑफर, ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने मला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी त्याला नकार दिला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वी देखील भाजपने माढ्यातून माझ्याच पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती, मात्र आता वेळ गेली आहे असे सांगून मी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले. असा गौप्यस्फोट दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

बारामती येथे कार्यकर्ता बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमच्यात वादावादी झाली तरी मी पुढील पाच वर्षे महायुतीसोबतच राहणार आहे. भाजपने जरी रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला बारामतीमधून उमेदवारी दिली तरी राहुल कुल रासप सोडणार नाहीत. आमचे यावेळी नुकसान झाले आहे. कार्यकर्ते चलबिचल आहेत, त्यांना समजवण्यासाठी मी फिरत आहे. खासकरून बारामती आणि माढा मतदारसंघामध्ये माझ्या पक्षाची ताकद लावणार आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपने माझे काही प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र मी देखील त्यांना माझ्याशिवाय तुम्हाला राज्यात यश मिळणार नसल्याचे सांगितले.

बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले वातावरण आहे. आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत, असा टोला जानकर यांनी लगावला.