‘त्या’ दोघांचे मृतदेह दरीतून काढण्यात यश

भीमाशंकर : पोलीसनामा ऑनलाईन – भीमाशंकर येथील नागफणी पॉईंट वरून दोन अनोळखी व्यक्ती ६०० फूट खोल दरीत पडल्याची घटना सोमवारी (दि.४) दुपारी घडली होती. दरीत पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह आज (मंगळवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. लोणावळा येथील शिवदुर्ग टीमच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहापैकी एक महिलेचा आहे तर दुसरा सात ते आठ वर्षाच्या मुलीचा आहे.

सोमवारी महाशिवरात्री निमीत्त भीमाशंकर येथे भाविकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी नागफणी पॉईंटवरुन दोन व्यक्ती पडल्याची माहिती खेड पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी दुर्बीणीतून पहाणी केली असता एक मृतहेद ४०० फूटांवर दिसून आला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. स्थानिक तरुणांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या बाजूने प्रयत्न केला. मात्र त्यांना मृतदेहापर्यंत पोहचता आले नाही.

आज लोणावळा येथील शिवदुर्ग टिमला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. या टीममधील समीर जोशी आणि प्रवीण ढोकळे यांनी ६०० फुट खोल दरीत रोपच्या सहाय्याने उतरुन मृतदेह बाहेर काढले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गचे गणेश गिध, समीर जोशी, प्रवीण ढोकळे, प्रणय आंबुरे, सनी कडू, अशोक उंबरे, अनिल आंद्रे, निकीत तेलंगे, राहुल देशमुख, आंनद गावडे, सुनील गायकवाड यांनी परिश्रम घेतले.