देहूरोड परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी / देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – देहूरोड येथील हनुमान कॉलनीतील विकास नगरमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह बंद घरात आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन मयत महिलेबाबत आजुबाजुंच्याकडे विचारपुस करण्याचे काम चालु आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात येत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

विकास नगरमध्ये एका बंद घरातून उग्र वास येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहचले असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला तर बाहेरून कुलूप लावलेले दिसले. पोलिसांनी बळाचा वापर करून कुलूप उघडले असता त्यांना एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आंथरूणावर पडलेला दिसला. घरातुन प्रचंड उग्र वास येत होता. त्यामुळे महिलेचा मृतदेह गेल्या चार-पाच दिवसांपासुन तेथे पडून असल्याचा अंदाज संबंधित पोलिसांनी वर्तविला आहे. देहूरोड पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे काम चालु आहे. परिसरात राहणार्‍या नागरिकांकडून त्याबाबत माहिती घेण्याचे काम चालु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. देहूरोड पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. महिलेचा खून झाला की महिलेशी घातपात करण्यात आला याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालु आहे.