बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शेततळ्यात आढळला मृतदेह

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह शेततळ्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भगतवाडी (ता. गंगापूर) शिवारात उघडकीस आली.

भगतवाडी शिवारातील मुळा कंपनी येथे रामदास मिसाळ (६०) मूळ गाव कळवेश्वर, जि. बुलढाणा हे आपल्या पत्नी व दोन नाती प्रिया (१४) व जागृती सतीश सरदार (१०) यांच्यासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी (दि. ७) रामदास हे पत्नीला घेऊन मूळ गावी गेले. शेतवस्तीवर दोघी बहिणीच होत्या.

प्रिया शौचालायासाठी घराबाहेर गेली असता ती परत आलीच नाही.घडलेल्या घटनेची माहिती जागृतीने आजोबाला फोनवरून देताच ते घरी येत आजूबाजूला शोध घेतला. प्रियाचा तपास न लागल्याने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून रामदास मिसाळ यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर मुळा कंपनीत मुर्शिदाबाद शिवारात (गट क्र.१५) शेतमजुरांची वसाहतीलगतच दोन मोठी शेततळी आहेत. कंपनीचे वॉचमन सकाळी राऊंडला गेले असता शेततळ्यात पाण्यावर एका तरुणीचा मृतदेह तरंगताना दिसला.

घटनेची माहिती वाळूज पोलिसांना मिळताच पाहणीनंतर मृतदेह प्रियाचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलीस पाहणीदरम्यान शेततळ्याच्या एका बाजूला प्लास्टिक पन्नीवर हाताचे ठसे आढळून आले. ते कोणाचे आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही. यावेळी पोलीस उपआयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोउनि प्रीती फड, पोउनि पवार, हेकॉ पांडुरंग शेळके, विजयसिंग जारवाल उपस्थित होते.