Pune News : गहुंजे स्टेडियमजवळ आढळला तरुणाचा मृतदेह, परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे स्टेडियमजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या तरुणाचा खून करण्यात आला की मृतदेह याठिकाणी आणून टाकला याचा तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमजवळ असलेल्या घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला हा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 असून हा मृतदेह आज पहाटेच्या सुमारास आढळून आला. घोरावडेश्वर डोंगरावर दर्शनासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी पहाटेच्या वेळेस डोंगर परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. दरम्यान, मंदिराकडे जाणाऱ्या पाय वाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला.

नागरिकांनी या घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मयत तरुणाच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पिवळ्या रंगाचा शर्ट आहे. या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान मयताच्या गळ्यावर एक रुपयाचे नाणे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिस या संदर्भात तर्कवितर्क लावू लागले आहेत. तसेच मयत तरुण हा मजुर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तळेगाव पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.