तलावात बुडालेल्या युवकाचा मृतदेह 19 तासांनी सापडला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलावातीय युवक अरबाज शौकत शेख (वय १८)पोहायला गेला असताना बुडून मयत झाला. त्याचा मृतदेह तब्बल 19 तासांनी पोलिसांना सापडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अरबाज हा तैयब शेख व रियान शेख या मित्रांसमवेत वाडेगव्हाण येथील तलावात पोहायला गेला होता. अरबाज पोहत असताना त्याचे मित्र मोबाईवर चित्रीकरण करीत होते. अरबाज तलावात दूरवर पोहत गेल्याने त्याला दम लागला. तो अचानक गटांगळ्या घेवून लागला. त्यानंतर काही वेळातच दिसेनासा झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अरबाज याचा शोध सुरू केला. परंतु यश न आल्याने दुस-या दिवशी शनिवारी कुरुंद येथून पाणबुडीसह वीस खाजगी पोहणारे पथक पाचारण केले. बोटीच्या व जाळीच्या साह्याने अरबाजचा मृतदेह सकाळी ११ वाजता पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. तहसिलदार प्रविण चव्हाणके शोधकार्यात उपस्थित होते.