…. तर मंत्र्याच्या तालुक्यातूनच मतदानावर बहिष्कार

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने मोहा गावच्या हद्दीत कलाकेंद्रांना परवानगी दिली आहे. त्यामुळे संतापलेल्या मोहा व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच आजपासून उपोषण सुरू केले जाणार आहे.

जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत व हापटेवाडी, रेडेवाडी, नाणेवाडी, मोहा या परिसरातील ग्रामस्थांचा कलाकेंद्रांना कडाडून विरोध होता. ग्रामस्थांनी यासाठी वेळोवेळी बंद, रास्तो रोको आंदोलन केले होते. तरीही जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून नुकतीच मोहा गावातील कलाकेंद्रांना परवानगी दिली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात तालुक्यातील ही गावे आहेत. ग्रामस्थ आक्रमक असताना प्रशासनाने त्यांना परवानगी दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ मोहा व परिसरातील ग्रामस्थांनी आजपासून उपोषण करण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रशासनाने परवानगीचा अट्टाहास का केला, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप?

परवानगी देण्याच्या काही दिवस अगोदर अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सदर कलाकेंद्राची परवानगी रद्द केली होती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात ही कला केंद्रे होती. काही कला केंद्राचे मालक हे मंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातूनच त्यांनी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून कला केंद्रांना परवानगी देण्यास भाग पाडले, असा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे.

पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच उद्रेक

पालकमंत्री राम शिंदे यांच्या तालुका व मतदार संघातीलच मोहा व परिसरातील गावकऱ्यांनी कला केंद्रांना विरोध करण्यासाठी वेळोवेळी रास्ता रोको, आंदोलन, बंद पाळला होता. अनेकदा तीव्र आंदोलन करूनही प्रशासनाने कलाकेंद्रांच्या बाजूने भूमिका घेतली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उद्रेक होऊ लागला आहे.