माढयामध्ये बेकरी चालकाचा खून करून टेम्पो पेटवला, केवळ चेहरा अन् हात शिल्लक राहिला

माढा : पोलीसनामा ऑनलाइन –   एका बेकरी चालकाचा निर्घृण खून करून टेम्पो जाळल्याची धक्कादायक घटना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माढा तालुक्यातील शिराळ येथील बेकरी चालकाचा निर्घृण खून करून टमटम जाळून पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय मारुती काळे (वय-50 रा. शिराळा ता. माढा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय काळे हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, संजय काळे हे शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेर आपल्या अंगणात झोपले होते. त्यानंतर मध्यरात्री संजय हे मालवाहतूक करणाऱ्या मिनी टॅम्पो (एमएच 45 6577) घेऊन कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास शेवरे येथे उजनी कालव्याच्या उजव्या बाजूच्या रस्त्या लगत टेंभुर्णी-अकलूज रोडजवळ लोकांना एक मालवाहतूक करणारा मिनी टेम्पो जळलेल्या अवस्थेत आढळून आला. लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता काळे यांचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आला. शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. बाकी संपूर्ण शरीर जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा, डाव्या बाजूचा कान तुटल्यासह जखमा दिसून आल्या.

मारेकऱ्यांनी काळे यांचा खून करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. खून कोणी आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजू शकले नाही. मारेकऱ्यांनी संजय काळे यांचा खून इतका क्रूरपणे केला आहे की, त्यांचा फक्त एक हात आणि चेहराच फक्त ओळखता येत होता. चेहऱ्यावर तीन वार करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांचा एक कान तुटला आहे. तर एक हात मिळून आला नाही तर धडापासून वेगळे झाले आहे. धडापासून खालचा भाग पूर्ण जळून खाक झाला आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.