भरदिवसा कारची काच फोडून साडेचार लाख लंपास

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लंपास केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. ही कार एका बांधकाम व्यवसायिकाची होती. बंधकाम व्यावसायिकाने त्याची कार कार्यालयासमोर उभी केली होती. पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी रक्कम पळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे.

निवृत्ती सुर्य़वंशी या बांधकाम व्यवसायिकाने आज दुपारी आकाशवाणी येथील एसबीआय बँकेतून ४ लाख ५५ हजार रुपये काढले. यातील पाच हजार रुपये खिशात ठेवून उर्वरीत रक्कम त्यांचे मित्र सचिन कासलीवाल यांच्या कारमध्ये (एमएच २० सीएच ४४०६ ) ठेवली. यानंतर ते दोघेही कारमधून कोकणवाडी परिसरातील जय टॉवर येथील सूर्यवंशी यांच्या कार्यालयाकडे आले. गाडी कार्यालयासमोर उभी करून दोघेही आत गेले. कंत्राटाबाबत काही माहिती घेऊन सूर्यवंशी आणि कासलीवाल पाच मिनिटातच बाहेर आले. यावेळी बाहेर उभ्या कारची काच फोडून त्यातील ४ लाख ५० हजाराची रक्कम चोरट्यांनी पळवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निलेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे मधुकर सावंत, वेदांत नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दिवसाढवळ्या दुचाकीवर येऊन रक्कम पळविण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.