काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान पंढरपूरमध्ये पार पडली बैलगाडा शर्यत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले असताना सांगोला तालुक्यातील घेरडी येथील अतीउत्साही लोकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केला आहे. ऐन संचारबंदी काळात 31 मार्च रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे 5 बैल व घोडा जोडीच्या गाड्यांची शर्यत घेत साधारणतः सहा किमी पळवले होते.

बैल व घोडा जोडीच्या गाड्या जोरात पळविण्यासाठी चाबकाने मारण्याचा प्रकार घडला आहे. घडनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात शर्यीतीचे आयोजक संतोष नामदेव खांडेकरसह अज्ञात 10 चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे.

एका दिवसात 235 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशभरातील आकडा अडीच हजारच्या वर गेला आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा राज्यात आहे. महाराष्ट्रात 400हून अधिक कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत.