…म्हणून मंत्रिमंडळ ‘विस्तार’ लांबला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मात्र, इच्छुकांच्या आशेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बोळा फिरविला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूरचे हिवाळी अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतरच विस्तार केला जाईल, असे पटेल यांनी सांगितले.

आता विश्वास दर्शक ठराव संमत झाला असल्याने लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार करुन अधिवेशनाच्या आधी काही लोककल्याणकारी निर्णय घेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे अशी बहुतांश आमदारांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित ठेवायचे असेल व पुढेही काही वेगळे घडू नये. तसेच पक्षविस्तारासाठी ते आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.

इकडे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे, तर तिकडे जयंत पाटील यांना ते पद देऊ, असे त्यांना सांगण्यात आल्याचे त्यांच्या नजीकचे लोक सांगत आहेत. मात्र पक्ष वाढवायचा असेल आणि पक्षाला पुढे न्यायचे असेल तर काहीही करुन अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद द्या, असा पक्षातील अनेक आमदारांचा आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्लीत गेले आहेत. रविवारी रात्री काँग्रेसचेही काही नेते दिल्लीला रवाना झाले. काहीही करा, पण नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार करा, असा दबाव तिन्ही पक्षातून आहे.

एक आठवड्याच्या अधिवेशनात दुखावलेल्या भाजपाला केवळ ६ मंत्री कसे सामोरे जाणार असा प्रश्न विचारुन त्याअगोदर विस्तार करण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे याचा निर्णय होत नसेल तर अधिवेशनाच्या आधी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी करुन घ्या, जेव्हा राष्ट्रवादीचा निर्णय होईल, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी करा, असेही अनेक आमदारांनी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले आहे.

काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद मागितले होते, पण राष्ट्रवादीत एकच उपमुख्यमंत्रीपद असावे असा अजित पवार यांचा आग्रह होता. शेवटी शरद पवार यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला आणि काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद न मागता नऊ कॅबिनेट व तीन राज्यमंत्रीपदे दिली जातील, असे स्पष्ट केले आहे.

Visit : policenama.com