‘आयात’ उमेदवाराला सभापतीपद, शिवसेनेच्या 2 गटात ‘राडा’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. मात्र निवडणुकीपूर्वी पक्षात आयात करण्यात आलेल्या उमेदवाराला थेट सभापतीपद दिल्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंचायत समिती सभापती पदावरून शिवसेनेच्या दोन गटांत मोठा वाद झाला. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुलाला विधानसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या संदेश चिले यांच्या पत्नीला सभापती पदाची लॉटरी लागली.

निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या प्रणाली चिले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसैनिकांनी पंचायत समिती दालनातच जोरदार वाद घातला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. प्रणाली चिले यांच्या नावाला शिवसेनेच्या एका गटाने जोरदार विरोध केला आहे.

यावेळी शिवसेना रामदास कदम यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम हेही हजर होते. त्यांच्यासमोरच हा वाद झाला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटात तू तू… मैं मैं झाली. अखेर सेनेकडून सभापती पदासाठी प्रणाली चिले तर उपसभापती पदासाठी स्नेहल सकपाळ दोघींचे अर्ज सादर झाले. मंडणगड पंचायत समितीत चार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य प्रणाली चिले यांना शिवसेनेच्या सदस्यांनी सूचक अनुमोदन दिल्याने त्या सभापती झाल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/