अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला ५ हजारांचा दंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला अर्ज भरण्याअगोदर ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागल्याचा प्रकार नेवासा येथे घडला आहे. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे या असे दंड झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. मात्र, त्याचा उमेदवारी अर्जाशी संबंध नाही. तर अर्ज भरण्यासाठी जी अनामत रक्कम भरावी लागते, त्याच्याशी संबंध आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रकार असावा.

आपल्या नावाची चर्चा व्हावी, अशी अनेक अपक्ष उमेदवारांची इच्छा असते. त्यासाठी त्यांनी काहीतरी शक्कल लढवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. मच्छिंद्र मुंगसे यांनीही तसा प्रयत्न केला पण, तोच त्यांच्या अंगाशी आला.

त्याचे असे झाले की, मुंगसे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेवासा नगरपंचायत कार्यालयात गेले. त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी पाचशे रुपयांचे २० बंडल करुन चिल्लर आणली होती. यापूर्वीच्या निवडणुकात अशाच प्रकारे काही उमेदवारांनी अनामत रक्कम भरताना ती चिल्लरच्या स्वरुपात भरली होती. ती मोजण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना काही तास घाम गाळावा लागला होता.

तशाच प्रकारे मुंगसे यांनी चिल्लर आणली होती. चिल्लर देताना त्यांनी फोटो काढले जातील, याचीही दक्षता घेतली होती. पण तेथेच घोळ झाला. निवडणुक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच सहायक निवडणुक अधिकारी समीर शेख यांनी हे चिल्लरचे बंडल पाहिले. तेव्हा त्यांना मुंगसे यांनी कायदा मोडल्याचे लक्षात आले. कारण मुंगसे यांनी ही चिल्लर प्लॅस्टिक पॅकेटमध्ये भरुन आणली होती. प्लॅस्टिक बंदी असताना प्लॅस्टिकचा वापर केल्याने त्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागला.

मुंगसे यांना प्रसिद्धी हवी होती, म्हणून त्यांनी चिल्लर आणली होती. पण, आता दंड झाल्याने त्यांना हवी असलेली प्रसिद्धी आपोआप मिळाली आहे.

Visit : policenama.com