गस्तीवरील पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाड्याने केलेली कार प्रवासातच चालकाला मारहाण करून चोरून नेली. कारच चोरून नेताना गस्तीवरील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू शिवारात ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, नातेवाइकाच्या कारवर चालक म्हणून बळीराम नारायण झिटे पुणे येथे काम करतात. हडपसर येथे काल (शनिवारी) रात्री झिटे मोटारीसह उभे होते. त्या वेळी तिघे त्यांच्याजवळ गेले. आमचा नातेवाईक मृत झाला असून, आम्हाला श्रीगोंद्याला जायचे आहे, असे सांगून त्यांनी मोटारीचे भाडे ठरवले. प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यावरील एका गावातून बहिणीलाही घ्यायचे आहे, असे सांगितले.

हे तिन्ही आरोपी मोटारीत मागे बसले होते. रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर डिझेल टाकून दौंडमार्गे काष्टीकडे येताना, त्यांनी बहिणीला गावातून घ्यायचे असल्याने निमगाव खलूमार्गे मोटार घेण्यास चालकास सांगितले. गार फाटा शिवारात आल्यावर त्यातील एकाने मोटार थांबविण्यास सांगितले. एकाने मागून दोरी टाकून चालक झिटे यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. झिटे यांना धमकावत जबरदस्ती खाली उतरविले. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व मोटार घेऊन आरोपींनी पळ काढला.

पोलिसांच्या गस्ती पथकाला चोरीची माहिती मिळताच, ते तातडीने घटनास्थळाकडे निघाले. पेडगाव येथे समोरून संशयित मोटार येताना पथकाला दिसली. गस्तीवरील पोलिसांनी दादा टाके यांनी मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्या अंगावरच थेट मोटार घालण्याचा प्रयत्न केला. टाके बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले. त्यानंतर आरोपींनी मोटारीसह पळ काढला.

Visit : Policenama.com