लिफ्ट न दिल्याने कारचालकाच्या तोंडावर मारला ठोसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात वाहतूकीचा प्रश्न जटील झाला आहे. वाहतूक कोंडीत अडकून त्रस्त झालेल्या वाहन चालकांना काही कारणाने वाहतूक पोलिसांनी अडविल्यावर त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यावर आता कडी झाली आहे. एका कारचालकाला एकाने लिफ्ट मागितली. त्याला त्यांनी नकार दिल्यावर त्यांच्या तोंडावर ठोसा मारुन जखमी करण्याचा प्रकार कर्वे रोडवर मंगळवारी घडला.

याप्रकरणी रमेश शंकरराव साखरे (वय ४४, रा. मातोश्री हाईट, मांजरी) यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कर्वे रोडवरील एस एन डी टी कॉलेजजवळील गिरीजा बंगल्यासमोर मंगळवारी चार वाजता घडला. रमेश साखरे हे आपल्या कारजवळ थांबले होते. तेव्हा तेथे एक जण आला व मुझे आगे छोड दो, असे सांगितले. पण, त्यांना तेव्हा निघायचे नसल्याने त्यांनी त्याला लिफ्ट देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने त्यांच्या तोंडावर ठोसा मारुन जखमी केले. त्यांच्या कारमधील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.

या प्रकरणी साखरे यांनी फिर्याद दिली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहे. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.