लाच प्रकरणात महावितरणच्या कर्मचाऱ्याला सक्त मजुरी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – तुटलेली वीजेची तार जोडण्यााठी १ हजार ४०० रुपयांची लाच स्विकारताना महावितरणच्या लाईनमन हेल्पर मोहन राख याला अँटी करप्शने रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई ३१ डिसेंबर २०१३ रोजी बीड येथे करण्यात आली होती. या प्रकरणात मोहन राख याला बीड जिल्हा न्यायाधीश व सहाय्यक सत्र न्यायधीश कोर्ट क्रमांक ३ चे न्यायाधीश उल्हास पौळ यांनी तीन वर्षे सक्त मजुरी आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे.

मौजवाडी येथील तक्रारदार यांच्या वस्तीमध्ये वीजेची तार तुटली होती. ही तार जोडण्यासाठी मोहन राख व त्याचा सहकारी गोपी ढेंगे यांनी तक्रारदाराला एक हजार ४०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून राख याला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी केला. राख विरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व पोलीस हवालदार बी.बी. बनसोडे यांनी काम पाहिले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

बीएच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दहशतवादी असल्याचा उल्लेख
गटारीतून गॅस काढूनच दाखवा, मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची राहुल गांधींकडून खिल्ली