‘त्या’ दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या : सीबीआयकडून दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांनीच गोळ्या झाडल्या असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. सीबीआयने पुढील बुधवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने यापुर्वी २०१६ मध्ये सनातनचा साधक याच्यावरही दोषारोपपत्र दाखल केले होते.

बंगळुरु येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने डॉ. दाभोलकरांची हत्या करण्यासाठी सचिन अंदूरेला पिस्तूल आणि दुचाकी पुरविल्याचा दावाही सीबीआये न्यायालयात केला होता.

डॉ. विरेंद्रसिंग तावडे याच्यासोबत मिळून आरोपींनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचला. २० ऑगस्ट २०१३ रोजी (घटनेच्या दिवशी) सकाळी सव्वा सात वाजण्याआधी ओंकारेश्वर पुलावर या हल्लेखोरांचे आणखी दोन साथीदार उपस्थित होते. डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना त्या दोघांनी करून दिली. त्यानंतर त्यांना दाभोलकर हेच असल्याची खात्री झाल्यावर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या. असे शरद कळसकरकडे केलेल्या तपासात समोर आले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मोटारसायकलवरून आलेले दोन हल्लेखोर अंदुरे आणि कळसकरच होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. नालासोपारा शस्त्र साठा प्रकरणात अटक असलेला आरोपी वैभव राऊतसोबत मिळून त्यांनी मुंबई, ठाणे, परिसरातील खाडीत चार पिस्तूलांची विल्हेवाट लावली असल्याचा दावा सीबीआयने याआधी न्यायालयात केला होता. याप्रकरणातील अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.