चाकण बाजारात आता दररोज होणार लिलाव

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दररोज कांदा-बटाटा खरेदी-विक्री लिलाव करण्याची मागणी चाकण सब मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बाजार समितीकडे केली होती़. यासंदर्भात आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनाही साकडे घातले होते अखेर आडते असोसिशनची बाजार समितीने मागणी मान्य केली आहे़ आता उद्यापासून चाकण बाजारात दररोज कांदा-बटाट्याचा लिलाव होणार आहे़.

दरम्यान, बुधवारी नवीन कांद्याची ८ हजार पिशव्यांची आवक होऊनही कांद्याला प्रति क्विंटलला तीन हजार १०० रुपये बाजारभाव मिळला आहे. कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात कांदा व बटाटा येत असतो. यासाठी सोमवारची साप्ताहिक सुट्टी सोडून मार्केट यार्डमध्ये दररोज कांदा-बटाटा खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी चाकण मार्केट यार्ड सब आडते असोसिएशनने बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांच्याकडे केली होती.

कांद्याची वाढती आवक लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे कांदा-बटाटाच्या हंगाम सुरू असेपर्यंत दररोज खरेदी विक्री सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. मोहिते पाटील त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची दैनंदिन खरेदी विक्री मार्केट सुरू करण्यास परवानगी दिल्याने उद्यापासून (दि. २८) रोजच्या रोज कांदा व बटाटा मालाची विक्री लिलाव होणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी चाकण बाजारात घेऊन यावा, असे आवाहन सभापती विनायक घुमटकर यांनी केले आहे़.