शहिद पोलिस कोरोना योध्यांच्या मुलांना पोलिस दलात नोकरी – महासंचालक हेमंत नगराळे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करुन कोरोना आटोक्यात आण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. कोरोना काळात कर्तव्य पार पाडत असताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. काही कोरोना योद्ध्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले. योद्धा गमावला तरी, पोलिस खात्याशी असलेली कुटुंबाची नात तुटता कामा नये, यासाठीच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर पोलीस सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे, राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी सांगितले.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील दिवंगत पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला दहा दिवसात प्रक्रिया राबवून पोलीस खात्यातील विविध पदावर नियुक्तीचे पत्र पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या परिवारातील नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नुकतंच पोलिस नोकरीत समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालक यांनी ठाण्यात घेतला. हा निर्णय राज्यात लागू करणार असल्याने पोलीस परिवाराच्या जीवनात आनंदाचा क्षण आला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या कसोटीच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य पार पाडले. ठाणे पोलीस हद्दीत कोरोनामुळे 34 पोलीस कर्मचारी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबातील वारसदाराला पोलिसांकडून पोलीस खात्यात नोकरी मिळाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते नुकतेच साकेत मैदानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे म्हणाले, मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या काळात पोलिसांवर जास्त भार होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पोलिसांनी मनापासून काम केले. तेव्हा शहिद पोलीस बांधवांच्या कुटुंबाची 10 दिवसात कागदपत्रांची पूर्तता करुन, मेडिकल चाचणी करुन ठाणे पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलल्याने ठाणे पोलिसांचे कौतुक करावे, तितके कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.