चेन्नई ला जाणारा मुलगा विमानातून पोहचला थेट पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पालकांशी वाद होऊन मुले घर सोडून जाण्याचे प्रकार नेहमीच कानावर येतात. पण येथे आईनंतर वडिलांशी असा दोन वेळा वाद होऊन युवक पळून जाण्याचा हा प्रकार प्रथमच घडला असावा. चेन्नईत बी टेकचे शिक्षण घेत असलेला तरुण  विमानाने चेन्नईला जात असताना आईशी पैशावरुन वाद झाला तेव्हा तो मुंबईला विमानातून उतरुन पुण्याला आला. वडिलांना घडलेला प्रकार कळताच वडील त्याला घेण्यासाठी पुण्याला आले तेव्हा त्यांच्याशी वाद होऊन त्यांनी मुलाकडील मोबाईल काढून घेतला. त्यामुळे रागावून तो पुन्हा निघून गेला. शेवटी भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला परत आईवडिलांच्या हवाली केले आहे.

प्रकाश जियालाल मौर्या हा वेल्लोर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे बी टेक इंजिअरींगचे शिक्षण घेत आहे. तो पुन्हा चेन्नईला विमानाने जात होता. मुंबई विमानतळावर तो २ जानेवारीला उतरला. तेव्हा त्याचे व आईचे पैशामुळे फोनवरुन वाद झाला. त्यामुळे चिडून तो पुढील विमानाने चेन्नईला न जाता सरळ पुण्याला सिंहगड कॉलेज येथील तरुणाचा मित्र गौरव चव्हाण याच्याकडे आला. त्याच्याकडे दोन दिवस राहिला.

४ जानेवारीला त्याचे वडील त्याला घेण्यासाठी पुण्याला आले. तेव्हा त्यांच्यात बरेच वादविवाद झाले. त्यामुळे तो आंबेगावातूनही कोणाला काही न सांगता निघून गेला. त्याच्याकडे मोबाईलही नसल्याने संपर्क साधणे अवघड झाले होते. त्याचे वडील अ‍ॅड. जियालाल मौर्या हे ६ जानेवारीला भारती विद्यापीठ पोलिसांकडे आले.

सहायक फौजदार उत्तर वीर हे स्वत: व आंबेगाव बीट मार्शल विभाग मार्फत परिसरातील लोकांना त्याचा फोटो दाखवून शोध घेत होते. तेव्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता नऱ्हे गावात हरवलेला तरुण त्यांना मिळाला. आंबेगाव पोलीस चौकीत त्याला अ‍ॅड. जियालाल व त्याची आई अपर्णा सिंह यांच्या स्वाधीन करण्यात आले.