रस्त्यावरील लोखंडी ड्रेनेजमध्ये मुलाचा अडकला पाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्यावर असलेली ड्रेनेजची झाकणांच्या जाळ्या गायब होणे, जाळीचे गज तुटलेले असणे हे नेहमीचे झाले आहे. पण, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेकदा ते धोकादायक ठरु शकतात. असा प्रसंग आज सकाळी एका अकरा वर्षाच्या मुलावर आला होता. अर्ध्याहून अधिक पाय ड्रेनेजच्या झाकणात गेलेल्या या मुलाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. ही घटना नवी पेठेतील हिरो होंडा शोरुमजवळ सकाळी साडेआठ वाजता घडली.

प्रशांत संतोष येवले (वय ११) असे या मुलाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वडिलांबरोबर एक विद्यार्थी शाळेतून स्वातंत्र्य दिन साजरा करुन येत असताना नवी पेठेतील हिरो होंडा शोरुम जवळ सकाळी साडेआठ वाजता ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाच्या आत त्याचा पाय अडकला.

[amazon_link asins=’B07FL8T3F2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cb685b6-a051-11e8-bf79-55e1db35f348′]

अग्निशमन दलाचे जवान तिथे जाताच एक लहान मुलाचा पाय गुडघ्यापासून खाली ड्रेनेजच्या त्या लोखंडी झाकणात पूर्णपणे अडकला असल्याचे दिसले. जवानांनी लगेचच स्प्रेडरचा वापर करुन व मुलाला धीर देऊन लोखंडी झाकणाचे छोटे गज एकमेकांपासून दूर करुन अलगद मुलाचा पाय सुखरुप बाहेर काढला. मुलाच्या पायाला सुदैवाने मोठी कुठलीही दुखापत झाली नसली तरी चालताना रस्त्यावरील ड्रेनेजकडे लक्ष देऊनच चालले पाहिजे असे मत तेथील नागरिकांनी व्यक्त केले.

मुलाचा पाय पाचच मिनिटात बाहेर काढल्यानंतर वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे भावुक होत विषेश आभार मानले. तर मुलाने जवानांना हातातील ध्वज उंचावून जयहिंद म्हणत सलाम केला. या बचाव पथकात एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, वाहन चालक ज्ञानेश्वर खेडेकर, जवान किशोर बने, प्रविण रणदिवे, संजय पाटील तसेच क्विक रिस्पॉन्स टिमचे जवान संतोष कार्ले, हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.