ज्यांचे रेव्ह पार्ट्यांचे चारित्र्य, त्यांना मावळात उमेदवारी : आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

मावळ/ पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेसाठी मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरीत्या पार्थ पवार यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे.

” मावळ लोकसभा मतदार संघात चॉकलेट पर्व सुरु आहे. ज्यांचे रेव्ह पार्ट्यांचे चारित्र्य आहे, त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली आहे. उद्याची सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार आहे? व्यसनाधीनांच्या हाती सत्ता देणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला “. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

आम्ही कुणाचे गुलाम नाही, अजित पवारांचे तर नाहीच नाही

यावेळी बोलताना ते म्हणले , “आम्ही कुणाचे गुलाम नाही आणि अजित पवारांचे तर नाहीच नाही हे मावळ लोकसभा मतदार संघाला दाखवून द्यायचे आहे. निवडणूक आता या धनदांडग्याच्या नातवांचे लाड पुरवण्यासाठी झाल्या आहेत. सगळीकडे थट्टा मस्करी सुरु आहे. असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना लगावला. ते पुढे म्हणाले, मावळ मतदार संघ हा आव्हानात्मक मतदार संघ आहे.

इथे राजकीय पक्षासाठी नव्हे तर मतदारांसाठीच आव्हान आहे. ‘ही आमची जहागिरी आहे’. ‘जे हवे आहे ते करू’, ‘मुकाट्याने सांगतो तो ते ऐका’ अशी इथली परिस्थिती आहे’. त्यामुळे आता जनतेला दाखवून द्यायचे आहे की आम्ही कोणाचे गुलाम नाही. लोकांनी यांना सत्ता दिली आहे ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र त्यांना आता मग्रुरी आली आहे”.

तुम्ही आमचे मालक नाहीत आम्हीच तुमचे मालक आहोत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे असे सांगत, योग्य त्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.