यवतमाळची ‘कोरोना’मुक्तीकडे वाटचाल !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा संसर्ग फोफावत असताना यवतमाळ शहरवासीयांना एक महिन्यानंतर दिलासा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या 29 दिवसांपासून यवतमाळ शहरात एकाही कोरोनाग्रस्ताची नोंद प्रशासनाकडे झालेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत शहरातील प्रतिबंधित भागातील निर्बंध पूर्णपणे उठण्याची शक्यता आहे.

यवतमाळ शहरातील राधानगरी भागातून सुरू झालेला संसर्गाचा प्रवास इंदिरा नगर, पवारपुरा, स्टेट बँक चौक, मेमन कॉलनी, डोर्लीपुरा, शारदा चौक असा राहिला. यवतमाळ शहरातील 98 व्यक्तींना कोरोनाने विळख्यात घेतले. सुदैवाने या सर्वांनी करोनाशी दोन हात करून ही लढाई जिंकली. या काळात इंदिरा नगर आणि पवारपुरा या परिसराची केंद्र सरकारकडे करोना हॉटस्पॉट म्हणून नोंद झाली. इंदिरा नगरमध्ये तब्बल 61 आणि पवारपुरा परिसरात कोरोनाचे 20 रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण हे ‘मरकज’हून यवतमाळात परतल्यानंतर करोनाबाधित आढळलेल्या रूग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेले होते. अगदी दीड वर्षांच्या बालकापासून 65 वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेक महिला, पुरूषांना करोना संसर्ग झाला होता. त्यामुळे इंदिरा नगर, पवारपुरा, मेमनकॉलनी, डोर्लीपुरा, पाटीपुरा आदी भाग प्रतिबंधित करण्यात आला होता.

रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बहुतांश भागातील प्रतिबंध प्रशासनाने टप्याटप्याने हटवले. सध्या केवळ इंदिरानगरातील काही भागात हे प्रतिबंध कायम आहेत. गेल्या 15 मे रोजी शहरातील इंदिरा नगर भागातून अखेरचा रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. उद्या 13 जून रोजी यवतमाळ शहरात एकाही कोरोनाबाधिताची नोंद न होण्यास 29 दिवस पूर्ण होतील. या रूग्णासही उपचारानंतर सुट्टी होऊन 14 दिवस झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला यवतमाळ शहरातील केवळ एक परिचारिका वगळता एकही कोरोनाबाधित रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल नाही.