मुळशीतील गरुड माचीवर ठरणार शहराच्या विकासाची “स्ट्रॅटेजी”

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

“सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस” प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांची “स्ट्रॅटेजी क्लेरिफिकेशन मिटिंग” मुळशीतील गरुड माची या वर्षाविहाराच्या ठिकाणी ठेवली आहे. या ठिकाणावरुन पालिकेचे अधिकारी शहराच्या विकासाची “स्ट्रॅटेजी” ठरविणार आहे.

विकासाच्या नावाखाली प्रशासनाने अधिका-यांची बडदास्त पुरवत मुलशी येथे अलिशान व्यवस्था केली आहे. शुक्रवारी (दि. 29) आणि शनिवारी (दि. 30) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस प्रकल्पांतर्गत स्ट्रॅटेजी क्लेरिफिकेशन मिटींग होणार आहे.

या मिटींगमध्ये महापालिकेच्या विविध विभागांतील 50 अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिका-यांची बडदास्त पुरविण्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने ऐनवेळी प्रस्ताव मांडून स्थायी समितीची मान्यता घेतली आहे. मात्र, ही बैठक चक्क थंड हवेच्या ठिकाणी ठेवल्याने चर्चेचा विषय बनले आहे.

सध्या पाऊसाचे दिवस आहेत. गरुडमाची हे ठिकाण मुळशी तालुक्यातील प्रसिध्द ताम्हिणी घाटात वसलेले आहे. याठिकाणी पावसाळ्याच्या तोंडावर रिमझीम पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या घाटाकडे धाव घेतात. संपूर्ण घाट परिसर वनक्षेत्रात दडलेला असल्यामुळे मंद धुक्याचा आल्हाददायक थंडावा अंगावर घेत निवांतपणाचा अनुभवही घेता येतो. त्यामुळे सध्या पर्यटकांची या घाटाकडे रांग लागली आहे. याठिकाणी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटरही आहे. त्यामध्ये प्रशिक्षण, प्रशासकीय बैठका, कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या ठिकाणी शहराच्या विकासाची रुपरेषा ठरणार की अधिका-यांची वर्षा विहार सहल होणार, याबाबत साशंकता आहे.

सामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी केला निषेध
शहर परिवर्तनाच्या नावाखाली मुळशीत जाऊन करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करना-या अधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निषेध केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी शहर परिवर्तनच्या नावाखाली मुळशीतील गरुड माची येथे जाणार आहेत. या पर्यटनाच्या टीखाणी त्यांची कार्यशाळा होणार आहे. यशदा किंवा शहरातील महापालिकेचे आटो क्लस्टर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे, निळू फुले नाट्यगृह या ठिकाणी देखील कार्यशाळा झाली असती. परंतु, अधिकाऱ्यांना मुळशीत जाऊन कार्यशाळा घेण्यात काय रस आहे.  पालिकेचे काम बंद ठेवून पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे कसले नियोजन केले जाणार आहे. कसले धोरण आखले जाणार आहे. गरुड माची हे मोठे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी बोटीची देखील सोय आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात निसर्ग दर्शन देखील ठेवले आहे.

आयुक्तांना कसलेही व्हिजन नाही. स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तनाच्या नावाखाली ते करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. यामध्ये मोठा गोलमाल आहे. तो देखील आपण लवकरच बाहेर काढणार असून मुळशीत जाऊन करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करना-या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.