नीरेत Lockdown च्या नियमाचे उल्लंघन करणारे कापड दुकान अखेर केले सील

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कापड दुकानदाराने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत दुकान सुरू ठेवल्याने शुक्रवारी (दि.२१) पुरंदरच्या तहसीलदारांच्या आदेशाने गुरु ड्रेसेस हे कापड दुकान सील करण्यात आले.

ब्रेक द चैन अंतर्गत शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापने बंद ठेवण्याच्या दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने नीरेतील भर बाजारपेठेतील अहिल्यादेवी होळकर चौकातील कापड दुकान सुरू ठेवणाऱ्या गुरु ड्रेसेस या कापड दुकानाच्या मालकावर पोलिसांनी कारवाई केली होती. भर रहदारी असलेल्या चौकातील हा कापड व्यावसायिक गेली महिनाभर सर्रास कापड दुकानाचे मुख्य शटर उघडून कापड विक्री करत होता. वास्तविक, अत्यावश्यक सेवेत कापड दुकान हे येत नसताना सुद्धा हा दुकानदार असे खुलेआम दुकान उघडून व्यवसाय करतो याबाबत इतर व्यावसायिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती . तो व्यावसायीक मुळचा बारामती तालुक्यातील असल्याने त्याला विषेश सवलत होती का अशी चर्चा बाजरपेठेतील कापड व्यावसायिक करत होते.

सोमवारी १७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुरु ड्रेसेस या कापड दुकानाच्या बाहेरील बाजूस कुलूप लावून या दुकानाच्या आत मध्ये मालक ग्राहकांना कपडे विकत असल्याचे आढळून आले. यानंतर नीरा पोलिस दुरक्षेत्राचे फौजदार कैलास गोतपागर, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा तलाठी बजरंग सोनवले, ग्रामसेवक मनोज डेरे, सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस पो. कॉ. हरिश्चंद्र करे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल अप्पा लकडे यांनी या दुकानावर छापा टाकून या दुकानदारास कापड विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. यानंतर पोलिसांनी या दुकानदारला ताब्यात घेत त्याच्यावर १८८ नुसार कारवाई करीत दुकान सील करण्याबाबतचा प्रस्ताव पुरंदरच्या तहसीलदारांकडे दिला होता.

त्यानुसार शुक्रवारी (दि.२१) पुरंदरच्या तहसीलदारांच्या आदेशाचे पालन करीत नीरेचे तलाठी बजरंग सोनवले, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर, पो. कॉन्स्टेबल हरिश्चंद्र करे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल अप्पा लकडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी सचिन ठोंबरे यांनी दुकान सिलबंदची कारवाई केली.