लॉकडाऊन हा विषय संपलाय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे अनलॉकवर मोठं विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना संसर्गित रुग्णांची वाढती संख्या काळजीचा विषय बनला असून, नागरिकांमध्ये प्रबोधन करुन त्यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. जे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा उपयोग करत नसतील त्यांना कुठेतरी दंड लावलाच पाहिजे. तशी स्थिती राज्यात निर्माण झाल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केलं. तसेच लॉकडाऊन बाबत सुद्धा त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.

राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून रुग्णसंख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. त्यासंदर्भात विचारले असता टोपे यांनी सांगितलं की, ‘रुग्ण संख्या जरी दहा लाखांच्यावरती गेली असली तरी साडेसात लाख रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. आकडा जरी वाढला असला तरी सक्रिय रुग्ण किती आहेत, हे लक्षात घ्यावे. या सक्रिय रुग्णांमध्ये तीन ते चार टक्के गंभीर असतात. संख्या वाढत असून नागरिकांना प्रबोधन करुन सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक केलं पाहिजे. तसेच नियम न पाळणाऱ्यांना दंड लावलाच पाहिजे. कारण जोपर्यंत लस निर्माण होत नाही. तोपर्यंत कोरोनासोबत जगायचं आहे,’ असे टोपे यांनी म्हटलं

तसेच ‘रुग्णाला बेड, ऑक्सिजन, आयसीयू मिळवून देण्यावर आमचा भर आहे. मृत्यूदर कमी झाला पाहिजे त्यासाठी ज्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट उपायोजना करता येतील, त्या आम्ही करत आहोत. नागरिकांनी सुद्धा सर्व कामात चांगल्या पद्धतीने सहकार्य केले पाहिजे,’ असे आवाहन यावेळी टोपे यांनी केलं.

जनता कर्फ्यूचा फायदा होतो
वाढत्या रुग्णांच्या अनुषंगाने काही शहरात, तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारला जातो आहे. त्याबाबत विचारले असतं टोपे म्हणाले, ‘एखाद्या जिल्हात बेडची क्षमता संपली असेल व ही क्षमता वाढवायची असेल, तर त्यावेळी जनता कर्फ्यूचा फायदा होतो. त्यामुळे नागरिक घरात थांबतात व संसर्ग होण्याचे प्रमाण घटते. दुसरा फायदा बंदच्या दरम्यान आरोग्य सुविधा वाढवण्यास मदत होते. म्हणून तेथील स्थानिक प्रशासन, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी छोट्या कालावधीचा जनता कर्फ्यू करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक पातळीवर विचार करतात. पण संपूर्ण लॉकडाऊन करणे हा विषय आता राहिला नसून, सध्या अनलॉक करण्याचे कामच टप्प्याटप्प्यात सुरु’ असल्याचं टोपे यांनी सांगितलं.