Pune : कोरोना महामारीत वृद्धाश्रमांची अवस्थाही बिकट- माजी सरपंच नीलम येळवंडे

पुणे : कोरोना महामारीमुळे नागरिक सैरभर झाले आहेत. रक्ताची नाती दूर जाऊ लागली आहेत. कोरोना आजाराने उग्र रूप धारण केले आहे, त्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटल मिळत नाहीत, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड आणि रेमडिसिव्हर इंजेक्शनसारखी औषधे मिळत नाहीत, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमध्ये वृद्धाश्रमांची अवस्थाही बिकट झाली आहे, असे मत निघोजे (ता. खेड)चे माजी सरपंच नीलम संदीप येळवंडे यांनी व्यक्त केले.

आळंदी येथील आपुलकी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष भागवत मुरलीधर बोराडे मागिल काही वर्षांपासून वृद्धाश्रम चालवित आहेत. वृद्धाश्रमांना मदतीची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन निघोजे गावचे माजी सरपंच नीलम संदीप येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप येळवंडे, सतिश मारुती आंद्रे, महिला अन्याय मुक्ती मंचाच्या संस्थापक अध्यक्षा प्रितीताई सोमनाथ चव्हाण, सचिव राजश्री बाबासाहेब पवार, कार्याध्यक्ष अजय भोसले यांनी किराणा स्वरूपातील साहित्य आपुलकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भागवत बोराडे यांच्याकडे भेट दिले.

महिला अन्याय मुक्ती मंचच्या अध्यक्षा प्रीती चव्हाण म्हणाल्या की, कोरोना महामारीचा विळखा दिवसेंदिवस घट बनत आहे. पहिली, दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येणार असून, ती लहान मुलांसाठी घातक ठरणार आहे. कोरोना महामारीचा मागिल वर्षभरापासून सर्वजण संघर्ष करीत आहेत. कोरोनाची भीती वाढत असल्यामुळे अनाथ आश्रमांना कोणी भेट देत नाही, त्यामुळे देणगी मिळत नसल्याने वृद्धाश्रम चालविणेही कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीतही आपुलकी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष भागवत महाराज वृद्धांना कोणतीही गोष्ट कमी पडू देत नाही, ही बाब कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.