शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता, ‘या’ बडया नेत्याचा आरोप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर गेली दोन महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेचा रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या वतीने सांगलीतील इस्लामपूर येथे निषेध करण्यात आला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत हिंसा घडवणा-यांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. पोलिसांचा विरोध झुगारून काही शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर गोंधळ घातला. या घटनेवरून भाजप आणि रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या निषेधार्थ बुधवारी आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा त्यावेळी काढण्यात आला.

सदाभाऊ खोत म्हणाले, दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून देशाचे तुकडे पाडू इच्छिणाऱ्या दहशतवाद्यांचे आहे. दिल्लीत घुसून दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांमुळे आंदोलनाचा खरा चेहरा समोर आला आहे. दोलनात हिंसा घडवणा-यांना केंद्र सरकारने तातडीने बेड्या ठोकाव्यात. असे ते म्हणाले. तसेच आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेऊ नयेत. दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, मोदी सरकारच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. हिंसक आंदोलनामागे डावे पक्ष आणि काँग्रेसचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.’ यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. असे ते म्हणाले.