पिस्टलसह तडीपार गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट -3 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई फन टाईम मॉलजवळ करण्यात आली. रोहीदास उर्फ पिंट्या लक्ष्मण गुप्ते (वय-36 रा. डायस प्लॉट झोपडपट्टी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाकडून तडीपार गुन्हेगारांची माहीती घेण्यात येत आहे. माहिती घेत असताना पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना पुणे शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार फन टाईम मॉलजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपी रोहिदास गुप्ते याच्यावर स्वारगेट, कोथरुड, सिंहगड रोड, शिवाजीनगर, खडकी, वारजे माळवाडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात 31 गुन्हे दाखल आहेत. त्याला ऑक्टोबर 2018 मध्ये दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, प्रविण तापकीर, संदिप तळेकर, दत्तात्रय गरुड, सुजित पवार, राहुल घाडगे, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, शकील शेख यांच्या पथकाने केली.

Visit – policenama.com