Nana Patole : ‘Lokdown चा निर्णय घेतला तर तो मोदी सरकारच्या नियोजनशून्य लॉकडाऊनसारखा नको’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही सूचनाही केल्या. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.

कडक निर्बंध अथवा लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनसारखा नसावा असे पटोले यांनी म्हटले आहे. मोदींच्या नियोजनशून्य लॉकडाऊनच्या निर्णयाने लाखो लोकांचे रोजगार गेले, लोकांचे प्रचंड हाल झाले तसे होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.

राज्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारने सध्या वीकेंड लॉकडाऊनसह काही कडक निर्बंध लावले आहेत. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कठोर निर्णयाची गरज आहे. लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. यासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन राहील, अशी ग्वाही पटोले यांनी दिली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून राज्यातील रुग्णांना ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय कराव्यात अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.