देशात अन्यायाविरोधात उठणारा आवाज दाबला जात आहे : नसीरुद्दीन  शहा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते,आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचं झाला आहे अशी काही दिवसांपूर्वी विधाने करून खळबळ उडवून देणाऱ्या अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे. आजच्या घडीला देशात द्वेष आणि क्रूरतेनं उच्छाद मांडला आहे आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या घरी छापेमारी करून त्यांची बँक खाती गोठवून आवाज दाबला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

नसीरुद्दीन शहा यांनी राज्यघटना आणि स्वतंत्र भारताबद्दल बोलताना अ‍ॅमनेस्टी इंडियानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. २०१८ मध्ये भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर अनेक कारवाया झाल्या. मात्र, यावर्षी आपल्या संवैधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देऊन आता या कारवाया थांबवा, असं केंद्र सरकारला सांगा, असं आवाहन ‘अब की बार मानवाधिकार’ या हॅशटॅगनं शेअर केलेल्या या व्हिडिओ ट्विटमध्ये करण्यात आलं आहे.

काय म्हणाले नसीरुद्दीन शहा –

‘राज्यघटनेचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा आवाज बळाच्या जोरावर दाबला जात आहे,’ असं ते म्हणाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. सुरुवातीलाच त्यातील नियम स्पष्ट केले होते. देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून देणं, लोकांना आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येकाला समान लेखलं पाहिजे आणि त्यांच्या सन्मानाबरोबरच मालमत्तेचंही संरक्षण केलं पाहिजे हा त्यामागील उद्देश होता, असंही त्यांनी सांगितलं. गरिबांची घरे, जमिनी आणि रोजगार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत, भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत, कायद्याचं रक्षण करत आहेत ते लोक आज तुरुंगात कैद आहेत. कलाकारांच्या कामांवर बंदी घातली जात आहे. पत्रकारांचाही आवाज दाबला जात आहे. धर्माच्या नावानं द्वेषाच्या भिंती उभारल्या जात आहेत. निष्पापांची हत्या केली जात आहे. देशात द्वेष आणि अन्याय-अत्याचारानं कळस गाठला आहे, असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी या देशात असुरक्षित वाटत आहे, असं वक्तव्य नसीरुद्दीन शहा यांनी केले होते . त्यानंतर त्यांच्यावर  टीकेची झोड उठवण्यात आली. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. तसेच त्या  वक्तव्यावरून उत्तर प्रदेश येथील शिवसेनेच्या नेत्याने अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना देश सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगितले होते  या पक्षाने नसीरुद्दीन यांचे ‘मुंबई ते कराची व्हाया कोलंबो’ असे विमानाचे तिकीट देखील बुक केले होते.