संविधानामुळेच देश एकसंध : शरद पवार

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन-संविधानामुळेच भारत देश एकसंध असल्याचे सांगत राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना लोकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा, काही लोक मूळ मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मूर्ती उभारण्यापेक्षा दुष्काळाने मरत असलेल्या लोकांना मदत करणे अधिक महत्वाचे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज मांडले.

पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून धनकवडी येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुद्देशीय भवनाच्या आवारात ‘संविधान स्तंभ लोकार्पण आणि सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले, भारताच्या आजूबाजूचे देश आणि पन्नास वर्षांचा इतिहास पाहिला तर काही ठिकाणी लष्कराचे राज्य आले, राजवटी उलथवून टाकल्या गेल्या, लोकशाहीचे राज्य उद्ध्वस्त करण्यात आले. नेपाळ, श्रीलंका, पाकीस्तान या देशांत आपण हे सर्व पाहिले. या देशांपेक्षा कितीतरी मोठा खंडप्राय भारत असताना, अनेक जातीचे धर्माचे भाषेचे राज्याचे लोक असतानाही हा देश एक विचाराने मजबूतीने उभा आहे. या देशातील राज्यपद्धती येथील लोकांना एकसंध ठेवण्याठी उपयुक्त पडली. यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेले संविधान आणि त्यातील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यामुळेच आपली अवस्था इतरांपेक्षा वेगळी आणि चांगली आहे.

आजकाल या देशात काही लोकांनी संविधान बदलण्याची भाषा करायला सुरुवात केली आहे. मागे कर्नाटकात एका मंत्र्यानेच अशी जाहिर भूमिका व्यक्त केली. यामागे जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणून मूठभरांच्या हातात सत्ता देण्याची काही लोकांची इच्छा आहे. पण हा देश हे कधीही मान्य करणार नाही. या देशातील सामान्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर हा देश हे मान्य करणार नाही.

या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव, सुभाष वारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे, काका चव्हाण, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला एक विचार दिला. तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा छोटा प्रयत्न आम्ही या संविधान स्तंभाच्या माध्यमातून करीत आहोत. अजितदादा पवार, आदरणीय शरद पवार साहेब आणि मी स्वतः असे  आम्ही तिघेही देवाची शपथ न घेता, संविधानाची शपथ घेतो. पुणे हे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर आहे. या शहराला आम्ही ही एक छोटीशी भेट देत आहोत. भविष्यात आणखी बऱ्याच ठिकाणी संविधान स्तंभ उभे करायचे आहेत. आम्ही सुरू केलेल्या या अभियानाची दखल घेत, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, झारखंड आणि अन्य काही राज्यातील खासदारांनीही त्यांच्या मतदार संघात संविधान स्तंभ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे, की ते खासदार आमच्या पक्षाचे नाहीत, तर भाजप आणि अन्य पक्षाचे आहेत. आम्ही खास करून महाराष्ट्राने सुरू केलेली ही मोहीम हळूहळू देशभर जात आहे, याचे खूप मोठे समाधान आहे. त्या पुढे म्हणाल्या, समाजात सध्या संविधानाबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. सत्तेत बसणारे लोकच यामध्ये पुढाकार घेत आहेत. एवढंच नाही तर संविधानची प्रत जाळण्याचाही प्रयत्न दिल्लीमध्ये काही लोकांनी केला.या सर्व घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्लीत जाऊन केला. महाराष्ट्रात परतल्यावर या महिला कार्यकर्त्यांनी संविधान बचाव आंदोलन सुरु केले. मला अभिमान वाटतो की, संविधानाबाबत अशी आग्रही भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. या आंदोलनात योगदान म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ९ संविधान स्तंभ उभारले जात आहेत. यावेळी डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, प्रशांत पगारे यांचीही भाषणे झाली.