देशाला बेरोजगारीच्या ‘रजिस्ट्री’ची गरज, योगेंद्र यादवांचा भाजपला ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाला नागरिक नोंदीची गरज नाही, गरजच असेल तर राष्ट्रीय बेरोजगारीच्या नोंदीची गरज आहे. जर सरकारने या बाबत विचार केला तर देशाचा हजारो कोटी रुपयांचा खर्च वाचेल. करोडो लोक भीती, शंकांपासून मुक्त होतील असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी मोदी सरकारला दिला आहे आणि यातूनच बेरोजगारीच्या समस्येचे निवारण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जाईल असा विश्वास देखील यादव यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी एनआरसीबाबत बोलताना असत्याचा आसरा घेतला. ते म्हणाले की, यावर तर अद्याप चर्चाही झालेली नाही. मात्र, सत्य हे आहे की, एनआरसीवर एकदा नव्हे तर अनेकदा विविध प्रकारे चर्चा झाली आहे. याची घोषणा गेल्या सरकारमधील गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती असे स्पष्ट मत यादव यांनी व्यक्त केले आहे.

कॅबिनेटद्वारे मंजुरी देण्यात आलेली ही योजना लागू करण्याची राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही घोषणा करण्यात आली होती. तसेच भाजपाने एनआरसीचा आपल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वचननाम्यातही समावेश केला होता. यादव म्हणतात, पंतप्रधानांनी दिल्लीत आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय नागरिक रजिस्ट्री (एनआरसी) संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार नाही, असे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी या योजनेची अंमलबजावणी सरकार करणार की नाही याचे मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिले नव्हते. सध्याच्या गृहमंत्र्यांनीही अनेकदा संसदेसहीत विविध व्यासपीठांवर एनआरसी योजनेचा पुनरुच्चार केला आहे.

सन २०२४ पर्यंत ही रजिस्ट्री पूर्ण करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहे, असं असतानाही पंतप्रधानांद्वारे निष्पापपणाचा आव आणणे आश्चर्यकारक आहे. जर त्यांना याबाबत माहितीच नसेल तर ते असं बोलून ते जनतेच्या शंका दूर करण्याऐवजी त्यांच्या मनात आणखीनच संशयाचे वातावरण तयार करीत आहेत, असा आरोपही यादव यांनी केला आहे.

देशात एनआरसी, सीएए याबाबत वातावरण तापत चालले आहे. काँग्रेसने या विरोधात जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढायला सुरुवात केली आहे तर तिकडे भाजपनेही या निर्णयाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून हा निर्णय कसा फायदेशीर आहे हे जनतेला सांगण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/