‘कोरोना’ लसीबाबत आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान, म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंधात्मक लस (Covid Caccine) संपूर्ण महाराष्ट्रात पोहाेचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह संपूर्ण कामे पूर्ण (Supply Plan) झाली आहेत. आता केवळ केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय, असे मोठे विधान राज्याचे आरोग्यमंत्री (Maharashtra Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

भारतात सिरमची चाचणी यशस्वी

राजेश टोपे म्हणाले, देशातील पाच औषध कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम करत आहेत. यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफाेर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची भारतात साडेबारा हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, तर संपूर्ण जगात साधारण 35 हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. मी स्वत: सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याचे टोपे यांनी सांगितले.

रक्तदान करण्याचे आवाहन

रक्तदानाबाबत बोलताना राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. रक्तदान करण्यात युवावर्ग नेहमी पुढे असतो. त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे. त्याचवेळी आपण सगळ्यांनीच रक्तदान केले पाहिजे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण होत आहे. त्यामुळेच रक्तदान ही निकड बनली असल्याचे सांगत त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कोरोनावरील लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून सिरमने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. आदर पूनावाला यांनी सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली, तर फायझरनेही त्यांची कोरोना प्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे. याशिवाय स्वदेशी कंपनी भारत बायोटेकनेही परवानगीसाठी अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांचे हे विधान महत्त्वाचे असून, राज्यात कोरोना प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.