बीडमध्ये ‘तीन तलाक’ विरोधात पहिला गुन्हा दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – तिहेरी तलाकविरोधी (मुस्लिम महिला विवाह संरक्षण) कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार बीड येथील पेठ पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सौ. मोमीन सना उर्फ मोमीन अब्दुल कलीम (वय-२२ रा. मोमीनपुरा पेठ, बीड) यांनी पती विरोधात फिर्याद दिली आहे.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मोमीन अब्दुल खालेद, सासू फरिदा बेगम,नणंद तब्बसुम यांच्याविरुद्ध मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा २०१९ च्या कलम चारप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादेवरून, मोमीन आणि अब्दुल यांचा विवाह 29 सप्टेंबर 2016 मध्ये मुस्लिम धर्म रितीरिवाजाप्रमाणे झाला.

लग्नानंतर आई-वडीलांकडून जनरल स्टोअर्समध्ये सामान आणण्यासाठी दोन लाख घेऊन येण्यास सांगितले. मात्र तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हकलून दिले. मोमीन हिची तलाक घेण्याची इच्छा नसताना पती अब्दुल याने तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला. त्याला सासू आणि नणंदेने प्रोत्साहीत केले. मोमीन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण हे करीत आहेत.