अपहरण झालेल्या ‘त्या’ नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय-९) याचे पाच दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. पोलीस प्रतीकचा शोध घेत असताना आज (गुरुवार) दुपारी त्याचा मृतदेह डोके यांच्या ऊसाच्या शेतात शेळ्या राखणाऱ्या महिलेला आढळून आला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी जंगजंग पछाडत त्या अपहरण झालेल्या प्रतीकचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता, आज गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून, घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिकच्या शरीरावर जखमा दिसून येत असल्‍याने घातपाताचा संशय बळावला आहे.
ही घटना उघडकीस आल्यामुळे तालुकाभर खळबळ माजली आहे. दरम्यान मृत प्रतिकच्या कुटुंबीयांनी प्रतिकचे प्रेत घेण्यास नकार दिला असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रतीक चा बळी गेल्याची भावना संतप्त कुटुंबियाकडून व्यक्त होत आहे. आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे.
प्रतीकचे वडील मधुकर दगडू शिवशरण हे माजी सरपंच आहेत. प्रतीक हा इयत्ता तिसरी वर्गात जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. शनिवारी २७ ऑक्टोबर रोजी शाळेतून आल्यानंतर तो दुपारी ३.३० वाजता खाजगी शिकवणीला गेला. दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रतीक घरी परतला. जेवण करून तो खेळण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर पडला. खेळून झाल्यानंतर तो माचनुर चौकातील धाब्यावर जाऊन येतो असे सांगून ढाब्याकडे एकटा गेला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. रात्री सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो न सापडल्याने वडीलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रतीकला नातेवाईकांकडे शोधण्यास सांगितले. सर्वत्र शोधाशोध घेऊन रविवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी प्रतीकचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.