मातीचा ढिगारा अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्यातील एका बांधकाम साईटवर काम करणा-या बिगारी कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून मृत्यू झाला. या प्रकरणी सुपरवायझर आणि ठेकेदाराविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) राहुलनगर येथील गोकुळ अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवर घडली होती.

सुधवा उराव (वय-५० रा. अभिलाषा डेव्हलपर्स साईट, मुळ रा. झारखंड) असे मृत्यू झालेल्या बिगारी कामगाराचे नाव आहे. सुपरवायझर सतिश पांडुरंग कांबळे (वय-३१, रा. बालेवाडी) आणि ठेकेदार नरेश बबन छुगाणी (वय-४६ रा. वडगाव-शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली आहे.

अभिलाषा डेव्हलपर्स यांची राहुलनगर जवळ गोकुळ अपार्टमेंट नावाची नवीन बंधकाम साईट सुरु आहे. बांधकाम साईटवर फाउंडेशनसाठी खोदलेल्या खड्ड्यातील एका पिलर जवळ सुधवा उराव काम करीत होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा पडला. यामध्ये ते गंभर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

कामगारांच्या जिवीताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना योग्य ती साधनसामुग्री पुरवली नाही. तसेच सुधाव उराव यांच्या मृत्यूस सुपरवायझऱ आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.