भरधाव टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर घडला. अजय सुतार (वय-५१ रा. सांगली) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. अजय सुतार यांच्या मृत्यूची बातमी समजताच पोलीस दलात खळबळ उडीली आहे.

अजय सुतार हे कुरपळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आज सकाळी त्यांनी प्रतीक पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून पंपावरून बाहेर पडत होते. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात गंभीर जखमी होऊन अजय यांचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव टँकर वाघावाडीकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी अजय सुतार यांनी हेल्मेट घातले होते. तरी देखील त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पतानी, मुलगा असा परिवार आहे.