‘त्या’ युवकाचा मृत्यू पोलीस मारहाणीत नसून विष पिल्याने

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी येथील तक्रार दाखल असलेल्या श्रीकांत माळी या  युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेद अहवालानुसार या युवकाचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधीक्षक शर्मा म्हणाले, तक्रार निवारण दिनी त्याच्याविरोधात तक्रार आली होती. त्या अनुषंगाने त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने मोटारीची एक पावती सोबत आणली होती. दुसरी पावती सोमवारी आणून देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्याला चौकशी करून सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सोडून देण्यात आले होते. त्यावेळी सरपंच बाळासाहेब जानकर त्याच्यासोबत होते. त्यानंतर सुमारे १८ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

त्याला पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो कोठे गेला होता. त्याने कोणाला फोन केले होते याचा सखोल तपास केला जाणार आहे. त्या तपासातूनच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्याला पोलिसांनी अजिबात मारहाण केली नव्हती. तसेच तो व्यवस्थित पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. शिवाय पाहणारे अन्य नागरिकही आहेत असेही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात.