जयंत पाटलांचे दरेकरांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्य वेळीच घेतला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    ज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्यापासून (सोमवार) उघडण्यास अखेर राज्य शासनाने परवानगी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. मात्र, उशिरा का होईना या सरकारला शहाणपण सूचले, हा निर्णय अगोदरच घ्यायला हवा होता, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. यावर राज्याचे मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant-patil) यांनी उत्तर दिले आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी असताना योग्य वेळी निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धार्मिक स्थळांसाठी नियम सारखेच असतील. मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल, सोशल डिस्टंसिंग हे अत्यंत महत्त्वाचे असणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळे सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती देताना, मुख्यमंत्र्यांनी हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असे म्हटले आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी दिली नव्हती. या मुद्यावरून भाजपने आक्रमक धोरण स्वीकारले होते. शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.