home page top 1

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एखादा व्यक्ती पूर्वीपासूनच एखाद्या आजाराने पीडित असेल असा अंदाज बांधून विमा कंपन्यांना विमाधारकाचा दावा फेटाळून लावता येणार नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला आहे.

विमाधारक व्यक्तीला एखादा जुना आजार असेल आणि त्याला त्याची कल्पना नसेल, विशेषत: त्याने त्यावर उपचारही घेतले नसतील, तर विमा कंपन्यांना त्याचा विम्याचा दावा नाकारता येणार नाही, असे आयोगाने याप्रकरणी स्पष्ट केले आहे. आयोगाने यासंबंधी ‘रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी’ची एक फेरविचार याचिका फेटाळून लावली. प्रस्तुत प्रकरण जळगावचे आहे. रेखा हल्दर या विमाधारक महिलेचा २४ जून २०११ रोजी मधुमेहामुळे मृत्यू झाला होता. त्यांनी १२ जुलै २०१० रोजी वरील कंपनीकडून विमा काढला होता. त्यावेळी त्यांना मधुमेह असल्याचे ठावूक नव्हते.

त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पतीने कंपनीकडे विम्याचा दावा दाखल केला. पण, कंपनीने विमाधारकाच्या जुन्या आजारपणाचे कारण पुढे करत त्यांचा दावा फेटाळून लावला. याविरोधात हल्दर यांनी जिल्हा तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. मंचाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर कंपनीला १.१२ लाख रुपयांसह शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार व खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त ३ हजार रुपये विमाधारकाच्या पतीला अदा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. कंपनीने या आदेशांना महाराष्ट्र राज्य आयोगापुढे आव्हान दिले.

तिथेही आयोगाने त्यांना महिलेच्या पतीला १ लाख १२ हजार ५०० रुपयांची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले. तद्नंतर रिलायन्सने ‘एनसीडीआरसी’कडे धाव घेतली असता आयोगाने ग्राहक हिताला प्राधान्य देत त्यांचा दावा फेटाळून लावला. ‘भारतात मधुमेह हा जीवनशैलीचा एक सामान्य आजार आहे. त्यामुळे केवळ या कारणामुळे कंपन्यांना विम्याचा दावा फेटाळता येत नाही’, असे आयोगाने याप्रकरणी स्पष्ट केले आहे.

Loading...
You might also like