आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे पोहचल्या दिल्लीच्या सीमेवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दिल्ली सीमेवर पोहचल्या आहेत.

गाझीपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ गेले आहे. शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे शिष्टमंडळ गाझीपूर सीमेवर गेले आहे. या शिष्टमंडळामधेये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सीमेवर पोहचले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही विविध पक्षांचे खासदार गाझीपूर बॉर्डर येथे निघालो आहो. सुमारे 70 दिवसांपासून हे शेतकरी या भागात आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांची योग्य देखील घेण्याची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले.

दरम्यान, मंगळवारी (दि.2) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने इत्यादी नेते उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भेटीनंतर इतर विरोधी पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ आज गाझिपूर सीमेवर पोहचले आहे.