‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करण्याची ‘अभाविप’कडून मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणाचे बाजारीकरण, आयआयटी कोचिंग क्लासेस व त्यांचा मनमानी कारभार तसेच ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंद कुमारची कथा मांडणारा चित्रपट ‘सुपर ३०’ ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली.

आयआयटी ही देशातील यश आणि संपन्नता प्रदान करणारी आणि जीवनमान बदलून टाकणारी व्यवस्था आहे. आयआयटीमध्ये जाण्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि बुद्धिमत्ता अशा दोन्ही गोष्टी लागतात. बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने, कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात, मागे राहतात. या चित्रपटामध्ये कोचिंग क्लासेस प्रशासनाकडुन विद्यार्थी व पालकांचे सर्रास होणारी आर्थिक पिळवणुक आणि शिक्षणाच्या बाजारीकरणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तसेच यामध्ये दिलेल्या उदाहरणात राजाचाच मुलगा राजा होणार; जो पात्र असेल तो नाही आणि राजाच्या मुलांना शिकवण्यासाठी, राजाच्या मुलांना श्रेष्ठ बनवण्यासाठी कोचिंग क्लासच्या द्रोणाचार्याकडून एकलव्याचा अंगठा कापला जाणे हे आजच्या काळातही कसे सर्रास सुरु आहे हे त्याच्या लक्षात येते. तेव्हा तो आपल्या साधन संपन्नतेकडे दुर्लक्ष करून या वंचित मुलांसाठी त्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी पुढाकार घ्यायचा निर्णय घेतो आणि केवळ तीस मुलं निवडून तो त्या मुलांना आयआयटीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय संघर्ष करतो, त्याची ही संपूर्ण कथा आहे.

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात भाष्य करणारे आणि समाज मनावर प्रकाश टाकणारे असे चित्रपट कर मुक्त झाल्यास त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता येईल. त्यामुळे अभाविपने ‘सुपर ३०’ हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी यावेळी केली आहे.

बिहारमध्ये हा चित्रपट सर्वात आधी कर मुक्त करण्यात आला, त्यांनंतर राजस्थान सरकारने देखील हा चित्रपट करमुक्त केला. आता आनंद कुमार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट राज्यात कर मुक्त केला आहे. या राज्यानंतर आता महाराष्ट्रात देखील हा चित्रपट करमुक्त व्हावा म्हणून मागणी करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त