कार्तिकी यात्रेच्या काळात विठूरायाच्या तिजोरीत 2 कोटींचे दान

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन-यंदा राज्यातील अनेक विभागात कमी पाऊस झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती जाणवू लागली असतानाही कार्तिकी यात्रेच्या सोहळयासाठी सहा लाख भाविकांनी पंढरी नगरीत हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने भाविक आल्याने विठूरायाच्या तिजोरीत मोठी रक्कम आली आहे. मुख्य म्हणजे नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला 1 कोटी 98 लाख 21 हजार 434 रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली असल्याचे समजत आहे. श्री विठ्ठलाच्या पायावर आलेल्या देणगीतून 23 लाख 77 हजार 981 रूपये आणि रूक्मिणी मातेच्या पायावर आलेल्या देणगीतून 7 लाख 92 हजार 260 रूपये जमा झाले आहेत.

अन्नछत्र देणगीतून 61 हजार 650 रूपये, पावती स्वरूपातील देणगी 88 लाख 69 हजार 186 रूपये, बुंदी लाडू विक्रीमधून 33 लाख २३ हजार 850 रूपये, राजगिरा लाडू विक्रीतून 3 लाख 33  हजार 500 रूपये, फोटो विक्रीतून 66 हजार 650 रूपये, भक्त निवास देणगीतून 4 लाख 91 हजार 09 रूपये, नित्यपूजा देणगी 4 लाख रूपये, हुंडी पेटी देणगी 24 लाख  88 हजार 537 रूपये, ऑनलाईन देणगीतून 2 लाख 71 हजार 730 रूपये,आणि अन्य स्वरूपातून 3 लाख 45 हजार रूपये अशी रक्कम प्राप्त झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या काळात मंदिर समितीने भाविकांना दर्शनासाठी सुलभ व्यवस्था केल्याने 5 लाख 6 हजार 335 भाविकानी विठूरायाचे पदस्पर्श दर्शन घेतले तर 3 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवाचे मुखदर्शनाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

उत्पातांच्या माहेरवाशिणींनी रुक्मिणीमातेला केले साडेचार लाखाचे दागिने अर्पण

पंढरपुरात उत्पात समाजाच्या लेकी आज समाजाने उभारलेल्या रुक्मिणी मातेच्या उपासना मंदिरात आल्या होत्या. या उत्पात समाजाच्या माहेरवाशिणींनी रुक्मिणीमातेला दहा तोळे सोन्याचे हार व बोरमाळेसह चांदीचा मोठा तांब्या आणि साडीचोळीचा आहेर अर्पण केला. इतकेच नाही तर साडेचार लाखांचे सोन्याचांदीचे दागिने अर्पण करून आपली सेवा बजावली.

म्हणून दिली देवीला सोन्याच्या दागिन्यांची भेट

विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यातून गेल्यावर उत्पात समाजाने उपासनेसाठी पंढरपूर शहरात प्रति रुक्मिणीचे उपासना मंदिर उभारून येथे विठ्ठल मंदिराप्रमाणे तेवढीच रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.  या मंदिरातील रुक्मिणीमातेलाही नवरात्र व इतर उत्सवाच्या वेळी सोन्याचे दागिने असावेत यासाठी या लग्न होऊन गेलेल्या लेकींनी एकत्र येत ही सोन्याच्या दागिन्यांची भेट दिली आहे.