‘त्या’ घटनेतून सरकारची हुकूमशाही मानसिकता : विरोधीपक्षनेते विखे पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती दौऱ्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून 2 विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश दिला. हा प्रकार राज्यघटनेची पायमल्ली करून हुकूमशाही मनोवृत्ती अधोरेखित करणारा आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला आहे. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान कार्यक्रमात प्रश्नोत्तरे सुरू असताना पत्रकारितेचा अभ्यास करमाऱ्या एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत शिक्षण देणार का? असा प्रश्न विचारला होता. मात्र या साध्या प्रश्नावरून तावडे भडकले आणि तुला शिक्षण घेणे जमत नसेल नोकरी कर, असे निरूत्साहित करणारे उत्तर दिले होते. दरम्यान या संवादाचे दुसरा एक विद्यार्थी मोबाईलवरून चित्रिकरण करीत असल्याचे लक्षात येताच तावडे यांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. प्रशांत राठोड आणि युवराज दाभाडे अशी त्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या घटनेवर संताप व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, या सरकारने असहिष्णुतेचा कळस गाठला आहे. अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असेल तर ही राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची गळचेपी आहे. त्या विद्यार्थ्यांनी मंत्र्यांसमोर असंसदीय किंवा बेकायदेशीर पद्धतीने नव्हे तर प्रश्नोत्तराच्या काळात अतिशय शांततापूर्वक पद्धतीने सरकारकडून आपली अपेक्षा मांडली होती. त्यांची मागणी मान्य नसेल तर मंत्र्यांनी किमान सौजन्याने नकार द्यायला हवा होता. मात्र त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देऊन आपली हुकूमशाही मानसिकता अधोरेखीत केली आहे.

Loading...
You might also like