युती झाली म्हणून मतभेद मिटले असं नाही ; ‘या’ धोरणाला आजही विरोध : आदित्य ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक येथे अगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर मोठ्या संख्येने तरुणाईने उपस्थिती लावली होती. यावेळी अनेक तरुणांनी आपल्या मनातले प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारले. भाजपसोबत वैचारिक मतभेद असताना युती का केली ? असा प्रश्न एका तरुणाने विचाराला त्यावर ‘युती झाली म्हणून मतभेद मिटले तसं नाही. नोट बंदीला आमचा आजही विरोध आहे’. अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे भाजपकडून घेण्यात आल्यानंतर शिवसेनेने युती केली. हिंदुत्ववादी आणि विकासवादी पक्ष एकत्र आल्याने देशाला फायदा होईल. युती झाली म्हणून मतभेद मिटले तसं नाही. नोट बंदीला आमचा आजही विरोध आहे. राष्ट्रहिताच्या मुद्द्यांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील असे सांगत शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

चिमुकल्याच्या प्रश्नामुळे एकच हास्यकल्लोळ

या कार्यक्रमादरम्यान तरुणांनी अनेक प्रश्न विचारले. यावेळी एलकेजी मध्ये शिकणाऱ्या एका चिमुकल्याने आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला त्यावेळी या चिमुकल्याला आदित्य ठाकरे यांनी स्टेजवर बोलावले आणि त्याला विचारले ‘काय आहे तुझा प्रश्न ‘? तेव्हा मात्र त्या चिमुकल्याने माझा काहीच प्रश्न नाही ‘असे सांगितल्यावर एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला. यावेळी तरुणाईकडून रोजगार आणि शैक्षणिक विषयांवर प्रश्ने विचारण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.