भाजप प्रवेशाबाबत हर्षवर्धन पाटील, प्रतीक पाटील यांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सांगलीतील काँग्रेस नेते प्रतीक पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चालली होती. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताचे हर्षवर्धन पाटील आणि प्रतीक पाटील यांनी खंडन केले आहे.

याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी संगितले की, “मी सध्या प्रवासात आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या ज्या बातम्या येत आहेत त्या साफ चुकीच्या आहेत. मी भाजप प्रवेश करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमचे पक्षश्रेष्ठी राहुलजी गांधी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला विधासभेची जागा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्हाला तिकीटाची चिंता नाही असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे” त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमची भेट राजकीय नाही

भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील यांची भेट झाली आहे. त्यामुळे प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र ही भेट राजकीय कारणासाठी झाली नसल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे.