विहिरीत पडलेल्या मुक्या प्राण्यासाठी ‘त्यांनी’ लावली जीवाची ‘बाजी’

एक महिन्यापूर्वी 40 फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याला मिळाले त्या युवकांमुळे जीवदान..

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील पडवी या गावाच्या उत्तरेला डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या 40 फुट खोल कोरड्या विहिरीत तहानेने व्याकुळ झालेला एक कुत्रा पाण्यासाठी धडपड करताना त्या खोल विहिरीत पडला होता. त्या घटनेला एक महिना झाला. परंतु पायऱ्या नसणाऱ्या त्या कोरड्या विहिरीत उतरून आत पडलेल्या त्या मुक्या प्राण्याला बाहेर काढण्याची हिम्मत कुणालाही होत नव्हती.

एक वयस्कर व्यक्ती दर दोन-तीन दिवसाला त्या मुक्या प्राण्याला भाकरी टाकत होती. ती भाकरी आणि विहिरीत एका बाजूला असलेले थोडे पाणी पिऊन हा मुका प्राणी कसाबसा जिवंत राहिला होता. एक महिना कोरड्या विहिरीत राहिल्यामुळे त्याची अवस्था मरणासन्न बनली होती. ही गोष्ट भांडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार शेंडगे आणि त्यांच्या सोबत काम करणारे सुहास दळवी, अक्षय गायकवाड, संजय गायकवाड, सोनू जगताप, हर्ष शितोळे यांना समजली. या सर्व युवकांनी मिळून त्या मुक्या प्राण्याला विहिरीतुन बाहेर काढण्याची योजना आखली. हे सामाजिक कार्यकर्ते दोरीच्या सहाय्याने त्या 40 फूट खोल कोरड्या विहिरीत उतरले आणि त्यांनी त्या अशक्त झालेल्या प्राण्याला एका पिशवीमध्ये बांधून वर काढले. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करून त्याला जीवदान दिले.

आजच्या युगात जिथे माणूस माणसाची मदत करताना दहा वेळा विचार करतो तिथे केवळ एका मुक्या प्राण्यासाठी या युवकांनी जीव धोक्यात घालून दाखवलेले धाडस खरोखरच वाखाणण्याजोगे असून खरोखरच या युवकांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे.