Video : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील मिरवणुकीचे चक्क ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ‘शुटिंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजानन मारणे याची 2 जणाच्या खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढल्या प्रकरणी मारणे याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर केला करण्यात आला आहे. पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे.

गजानन मारणे हा सोमवारी (दि. 15) सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्स्प्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या. एक्स्प्रेस हायवेवर मावळ, उर्से टोलनाका भागात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या गर्दी जमवल्या प्रकरणी मारणेवर गुन्हा दाखल झाला आहे. मारणेची 2 जणांच्या खून प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्यांची एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात 300 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्या दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. मारणे हा रात्री कोथरुडमधील पौड रोड येथील घरी दोन – तीन गाड्यांसह पोहचला.