आता ED ची वक्रदृष्टी राज्याच्या कृषी विभागावर, आघाडी सरकारची उघडणार ‘फाईल’?

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन –  महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ED ने नोटीसा बजावल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आता ईडीची वक्रदृष्टी राज्य सरकारच्या कृषी विभागावरच पडली आहे. 2007 ते 2014 या काळात कृषी विभागातील सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा संशय ED ने व्यक्त केला असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. पण, आता नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारपुढे एकएक अडचणी वाढत चालल्या आहे. नेते आणि आमदारांपाठोपाठ ईडीची नजर आता राज्य सरकारच्या कृषी विभागावर आहे. 2007 ते 2014 च्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना कृषी विभागामार्फत चालवण्यात सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याची शंका ईडीला आहे. अंदाजे 800 कोटींचा हा व्यवहार असून यात मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

आधीच ED ने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली आहे.